निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह गणापुरे, आव्हाड यांची चौकशी करून बडतर्फ करा

गजानन मालपुरे, दीपक कुमार गुप्ता यांची पत्रकार परिषदेत मागणी, पत्रकारांसह कार्यकर्त्यांवरील पोलिसांच्या ‘दंडुकेशाही’चा निषेध
जळगाव प्रतिनिधी : मतमोजणी केंद्रावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सुपारी घेतल्यासारखे काम करणारे निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष मारहाणीचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता उपस्थित होते. मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक १० चे उमेदवार कुलभूषण पाटील आणि प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार मयूर कापसे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दिला होता. अवघ्या १५ ते ३० मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली असती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी जाणीवपूर्वक हा अर्ज फेटाळून लावला. केवळ सत्ताधारी पक्षाच्या लोकांचेच अर्ज स्वीकारले गेल्याचा आरोप मालपुरे यांनी केला आहे.
यावेळी शांततेत मागणी करणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह उपस्थित महिला व पुरुष कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली. “निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांनी सुपारी घेतल्यासारखे काम केले,” अशी घणाघाती टीका मालपुरे यांनी केली.
पत्रकारांनाही धक्काबुक्की
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाही या केंद्रावर पोलिसांनी मज्जाव केला. मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारत पोलिसांनी पत्रकारांना ढकलून दिले आणि त्यांच्यावरही दंडुकेशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याचे मालपुरे म्हणाले.
शिवसेनेच्या मुख्य मागण्या
विनय गोसावी (निवडणूक निर्णय अधिकारी): फेरमतमोजणीचा हक्क नाकारल्यामुळे आणि पक्षपातीपणा केल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे.
नितीन गणापुरे व बबन आव्हाड: पत्रकारांना धक्काबुक्की करणे, विनाकारण बळाचा वापर आणि मारहाण केल्याप्रकरणी या पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांना सेवेतून मुक्त करावे.
खोट्या फिर्यादीचा निषेध: ‘ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला’ असा खोटा गुन्हा कुलभूषण पाटील व कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे, तो त्वरित मागे घ्यावा.
या संदर्भात मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.









