एमआयडीसी, नशिराबाद येथे आढळले मृतदेह
जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्या जळगावचा पारा हा ६ ते ९ अंशांमध्ये असल्यामुळे थंडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याचाच फटका अनेक नागरिकांना बसताना दिसतो आहे. शुक्रवारी सकाळी नाईट ड्युटी करून खोलीत गेलेल्या कामगारासह नशिराबाद येथे मंदिराच्या ओट्यावर एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे मृत्यू थंडीमुळे झाले असावे असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

एमआयडीसीमध्ये गोविंद इंडस्ट्रीज या चटई कारखान्यात रवींद्र टेंगरी प्रसाद (वय ४९, रा. उत्तर प्रदेश) हे कामाला आहेत. गुरुवारी त्यांनी नाईट ड्युटी करून शुक्रवारी सकाळी ते खोलीवर परत आले आणि झोपून गेले. दुपारी त्यांचे सहकारी त्यांना पाहण्यासाठी आले असताना ते चादर मध्ये लपेटलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
तर दुसऱ्या घटनेत नशिराबाद येथे खंडेराव मंदिराच्या ओट्यावर एका ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वामन भगवान लकडे (वय ७६, रा. हनुमान मंदिर परिसर, रायपूर, जिल्हा बुलढाणा) असे त्यांचे नाव आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला तेथे तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
दरम्यान मृतदेहांचे प्राथमिक अवलोकन करता थंडीमुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. सविस्तर कारण हे शवविच्छेदन झाल्यानंतर समजून येणार आहे. दरम्यान, लहान मुलांसह मोठ्यांनी थंडीची काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात उबदार कपडे घालावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी केले आहे.









