ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाची उदासीनता
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे त्याच्या पायाच्या ठशांवरून दिसून आले आहे. तसेच, काही शेतकऱ्यांचे पशुधनाची हानी झाली असून बिबट्याने हल्ला केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाची उदासीनता आली आहे.
तालुक्यातील लमांजन शिवारात गिरणा धरणाजवळ शंकर महाराज जगताप यांच्या शेतात गुरुवारी रात्री जंगली प्राण्याने त्याच्या गोऱ्यावर हल्ला केला होता. शुक्रवारी बिबट्याचे पायाचे ठसे शेतात आढळल्याने आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुमारास वनपाल संदीप पाटील, वनरक्षक माया परदेशी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनास्थळी मयत गोऱ्हा नव्हता पण रक्त पडलेले होते. यावेळी शेतकरी व लमांजन पोलिस पाटील भावलाल पाटील उपस्थित होते. यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे.
लमांजनसह आजूबाजूच्या गावातही बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थ माहिती देत आहेत. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त लवकर केला पाहिजे. नुकतेच धुळे जिल्ह्यात बोरकुंड येथे लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना ताजी आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे.