योजना ३१ मार्च पर्यंतच सुरु, लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : महावितरणची अभय योजना २०२४ हि दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी सुरु आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सदर योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरु आहे.
योजना काळात १०फेब्रृवारीपर्यंत जळगाव परिमंडलातील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील ६ हजार १५५ ग्राहकांनी ७ कोटी ७ लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. या योजनेमुळे ६१५५ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण ७७. २२ लाख रूपये माफ झाले आहेत. कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.
योजनेनुसार संपूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. तरी अधिकाधिक कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे. १ सप्टेंबर २०२४ पासूनच्या योजना काळात १० फेब्रृबारीपर्यंत जळगाव जिल्हयातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ४०१२ ग्राहकांनी योजनेत ४ कोटी ४० लाख रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. धुळे जिल्ह्यातून १३८७ ग्राहकांनी १ कोटी २१ लाख ५६ हजार रुपयांचा तर नंदुरबार जिल्ह्यातून ७५६ ग्राहकांनी १ कोटी ४४ लाख ८८ हजार रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे.
जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.