लक्षवेधी सजीव श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाह सोहळ्याने भाविकांच्या चैतन्यात वाढ
जळगाव (प्रतिनिधी) – येथील नेहरू नगर भागात अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये भाविकांना दररोज परमेश्वर अनुभूती येत आहे. संगीतमय भागवत कथेवेळी भगवान श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाह सोहळ्याच्या सजीव देखाव्याला भाविकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. नेहरू नगर परिसरात भागवत कथा आणि कीर्तन सप्ताहामध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे.
नेहरूनगर येथे गुरुदत्त मंदिर मध्ये शिवराजे फाउंडेशनद्वारा श्रीमद् भागवत संगीतमय कथा आणि हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. वृंदावन येथील भागवताचार्य सोपानदेव महाराज हे दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा सांगत आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळादेखील झाला. महिला भाविकांनी श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा केला. भगवान श्रीकृष्णाचा महिमा भागवताचार्य सोपानदेव महाराज यांनी कथेमध्ये सांगितला.
शुक्रवारी दि. १७ डिसेंबर रोजी भगवान श्रीकृष्ण-रुख्मिणी यांचा विवाह सोहळ्याचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात भगवान श्रीकृष्णाची व रुख्मिणीची भूमिका अनुक्रमे उमेश व त्यांच्या पत्नी नेहा यांनी साकारली होती. मंत्रोच्चारात श्रीकृष्ण रुक्मिणी यांचा विवाह लागला. सजीव देखाव्यामुळे भाविकांमध्ये चैतन्य पसरले होते.
भगवान श्रीकृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञ, एक ज्ञानी आणि दैवी साधनसंपत्ती असलेली महान व्यक्ती होती. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये महान कर्मयोग दडलेला आहे, असे मार्गदर्शन सोपानदेव महाराज यांनी केले.
प्रसंगी शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती व नगरसेवक जितेंद्र मराठे व नेहरू नगर भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.