मृतांची संख्या झाली ६ ; दालवाले परिवारातील चौघांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : वाहनामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट होऊन गंभीररित्या भाजले गेलेल्या तरुणाचा उपचार सुरु असताना सोमवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:२५ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. या स्फोट प्रकरणातील मृतांची संख्या ६ झाली आहे. यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
देवेश भरत दालवाले (१९, रा. यमुना नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. खासगी वाहनामध्ये गॅस भरताना इच्छादेवी चौकामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन वाहनासह आजूबाजूच्या दुकानाला आग लागली होती.(केसीएन)त्यात ११ जण भाजले गेले होते. या घटनेतील ११ जखमींपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दालवाले कुटुंबीतील लहान मुलगा देवेश याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. यामुळे दालवाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यापूर्वी देवेशचा मोठा भाऊ सूरज भरत दालवाले (२३, रा. यमुना नगर) या तरुणाचा सोमवारी दि. ११ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या मृत्यू झाला.(केसीएन) त्याच्या दोन दिवसांपूर्वीच दि. ९ नोव्हेंबर रोजी दोघं भावांचे वडील भरत सोमनाथ दालवाले (५५, रा. यमुना नगर) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. तर त्यांच्याच परिवारातील पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संजय गणेश तेरवडीया (दालवाले, वय ५५, रा. गणेश पेठ, पुणे) यांचा बुधवारी दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला.
याव्यतिरिक्त गॅस सेंटर चालक दानिश शेख व वाहन चालक संदीप शेजवळ यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.(केसीएन)जखमी ११ पैकी मृतांची संख्या एकूण ६ झाली असल्यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अवैध व्यवसायांवर वचक बसला पाहिजे अशी मागणी नागरिक करीत आहे.