जळगाव(प्रतिनिधी)- जळगावकडून पाचोर्याकडे रेल्वेने जात असतांना धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगाव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ लिपीकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा सामान्य रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप गणपत घोडेस्वार (वय-55,रा.वाघनगर) हे जळगावहून पाचोर्याकडे जात असतांना जळगाव ते शिरसोली डाऊन लाईनवर खांबा क्रमांक 415/7-9 या ठिकाणी ते पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. याबाबत उपस्टेशन प्रबंधक विनय सिन्हा यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास प्रफुल्ल धांडे करीत आहेत. दरम्यान मयत दिलीप घोडेस्वार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान मयताच्या खिशात मतदानकार्ड सापडल्याने त्यावरून त्यांची ओळख पटली. यावेळी जिल्हा रूग्णालयात त्यांच्या कुटूंबीयांनी आक्रोश केला.