जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या तिस-या लाटेला सुरुवात झाली असून बुधवारी दि.१२ जानेवारी रोजी २८५ रुग्ण कोरोनाबाधित म्हणून समोर आले आहेत. कोरोना महामारीचा शिरकाव आता जळगाव जिल्हा कारागृहामध्ये देखील झाला असून १३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर त्यांना मोहाडी येथील कोविड रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र कोरोना महामारीने आता डोके वर काढले आहे. जळगाव, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव या ठिकाणी संसर्ग वाढत आहे. आता जळगाव जिल्ह्यात १०३२ ॲक्टिव रुग्ण आहेत. जिल्हा कारागृहामध्ये देखील काही कैद्यांना कोरोना आजाराची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाने त्यांचे नमुने देऊन तपासणी करून घेतली होती.
त्यात १३ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांची प्राथमिक तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करीत सर्व १३ कैद्यांना मोहाडी येथील कोविड रूग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित केले. त्यामुळे आता जिल्हा कारागृहात देखील कोरोना महामारीने शिरकाव केल्यामुळे इतर कैद्यांच्या तपासणीचा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, एक सहा वर्षीय बालक देखील कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यालाही उपचारासाठी मोहाडी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे.