आतापर्यंत ३० जणांचा समावेश
जळगाव ( प्रतिनिधी ) – महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने शिस्तीचा बडगा उगारला आहे. पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी मागील काही दिवसांपूर्वी २७ जणांची आणि आता पुन्हा तीन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय सोनवणे यांचाही समावेश आहे.


निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणे किंवा पक्षाची धोरणे न पाळणे यावर भाजपने कडक पवित्रा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यकर्त्यांमुळे पक्षाच्या प्रतिमेला आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदे तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहेत.
हकालपट्टी करण्यात आलेले पदाधिकारीमध्ये अक्षय चत्रभुज सोनवणे: (जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष), किशोर (श्रीकृष्ण) गोविंदा वाघ: (प्रभाग १९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवारी केल्याने कारवाई), देवयानी सुभाष चौधरी: (प्रभाग १३ ‘ब’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असल्याने कारवाई) यांचा समावेश आहे.
जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, हा निर्णय पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त अबाधित राखण्यासाठी घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराच या कारवाईतून बंडखोरांना देण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत या हकालपट्टीचे काय पडसाद उमटतात आणि संबंधित उमेदवार आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









