कारवाई पुढे सुरूच ठेवण्याचा पोलिसांचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असून, या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कठोर कारवाई केली आहे. मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पतंग गल्ली (जोशी पेठ) आणि भुसावळ शहरातील काही ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मांजा जप्त करण्यात आला आहे.
जोशी पेठ, जळगाव येथे संशयित आरोपी किरण भगवान राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ४ हजार ८०० रुपयांच्या १६ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आली आहे. तर याच भागात संशयित आरोपी कुणाल नंदकिशोर साखला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्याच्याकडून ८ हजार ८०० रुपयांचा ३२ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आली आहे.
भुसावळ येथे सराफ बाजार परिसरात अजय काईट दुकानावर छापा टाकून संशयित आरोपी नितीन गोपाळ पत्की याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून ६ नायलॉन मांजाचे चक्री, किंमत १ हजार ४०० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे. सफौ रवि नरवाडे, अतुल वंजारी, गोपाल गव्हाळे, सचिन पोळ, प्रदीप सपकाळे, प्रदीप चवरे इत्यादींनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शन लाभले.