पारोळा शहरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : शहरातील एका हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास गटारी अमावास्येच्या पूर्वसंध्येला अज्ञात चोरट्याने हॉटेलमध्ये असलेली ४० हजार रुपयांची दारू, बिअरच्या बाटल्या लंपास केल्याची घटना घडली.
हॉटेल ग्रीन पार्क मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास बंद झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी येथील व्यवस्थापक हॉटेल उघडण्यास आला असता बाहेरील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसले. हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला होता.
हॉटेलमध्ये असलेल्या महागडी दारू, बिअर, सिगारेट असे भरून ते पसार झाले. चोरांनी महागड्या व्हिस्की त्याच ठिकाणी संपवल्या व किचनमध्ये जेवणावरही ताव मारला. त्यानंतर चोर पसार झाले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला.