कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, अथांग जैन यांनी स्वीकारला सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसेवा) :- नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरोपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट लार्ज एन्टरप्राईजेस गटात उत्कृष्ट निर्यातबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या प्राचीन आध्यात्मिक व व्यापार नेतृत्वाची आठवण करून दिली. तसेच नागरिक व हितधारकांना भारताला पुन्हा ज्ञान व वाणिज्याचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गेल्या दशकात जागतिक व्यापारातील आव्हान असूनही भारताच्या अभियांत्रिकी निर्याती ७० अब्ज डॉलर्सवरून ११५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडल्याबद्दल त्यांनी ईईपीसी इंडियाचे कौतुक राष्ट्रपतींनी केले. “नेशन फर्स्ट”च्या भावनेने जागतिक व्हॅल्यू चेनमध्ये भारताचा सहभाग वाढवण्याचे तसेच जागतिक नवोपक्रम अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान बळकट करण्याचे आवाहन केले.
जैन इरिगेशनचा पुरस्कार कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि जैन फार्मफ्रेश फुड लि. चे संचालक अथांग जैन यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडून स्वीकारला. या सोहळ्यास वाणिज्य व उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल व ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा उपस्थित होते. जैन इरिगेशनला मिळालेला हा पुरस्कार भारताच्या अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील कंपनीच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे द्योतक आहे.
प्लॅटिनम जयंती कार्यक्रमानंतर ईईपीसी इंडियाने २०२३–२४ या आर्थिक वर्षातील अभियांत्रिकी निर्यातीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध कंपन्यांना पुरस्कार प्रदान केले. या प्लॅटिनम जयंती व पुरस्कार सोहळ्याने भारताने एक ट्रिलियन डॉलर्स माल निर्यात साध्य करण्याच्या ध्येयात अभियांत्रिकी निर्यातीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा म्हणाले, “आमच्या ७० व्या वर्धापन दिनाने जागतिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक दर्शवले आहे. हे पुरस्कार भारताच्या निर्यात वृद्धीला दिशा देणाऱ्या नवोपक्रमकर्त्यांचा गौरव करतात.”
जैन इरिगेशन कंपनी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योग, सौरऊर्जा, प्लास्टिक पाइप्स आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अग्रगण्य स्थान राखते. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळात कंपनीने निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि जगातील विविध देशांपर्यंत आपली उत्पादने आणि तंत्रज्ञान पोहोचवले आहे. अत्याधुनिक संशोधन, गुणवत्ता आणि शाश्वत कृषी विकासाच्या मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीमुळे जैन इरिगेशनने लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे आणि जागतिक ग्राहकांचा विश्वासही संपादन केला आहे.
या सन्मानाबद्दल कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, शुभचिंतक आणि सहकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. इंजिनीअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया (EEPC India) ही भारतातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक उत्पादक कंपन्यांच्या निर्यातीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारी प्रमुख संस्था आहे, जी दरवर्षी विविध श्रेणींमध्ये निर्यातदारांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा आणि बळ प्रदान करते.
या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले, “हा पुरस्कार केवळ आमच्या कंपनीचा सन्मान नाही, तर भारताच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीचा गौरव आहे. आम्ही हा सन्मान देशातील शेतकरी बांधवांना आणि कंपनीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो, ज्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही उपलब्धी शक्य झाली आहे. निर्यात क्षेत्रात जैन इरिगेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि ही एक सामूहिक यात्रा आहे, जी नवोन्मेष, गुणवत्ता आणि शाश्वत विकासावर आधारित आहे. या सन्मानामुळे भविष्यातही भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकेल.”
ईईपीसी इंडिया ची स्थापना १९५५ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत करण्यात आली. अभियांत्रिकी निर्यातीला प्रोत्साहन देणारी ही सर्वोच्च संस्था असून तिचे १२,००० हून अधिक सदस्य आहेत, ज्यात लघु व मध्यम उद्योगांचाही मोठा वाटा आहे. धोरणात्मक सल्ला, बाजारपेठ विकास, खरेदीदार-विक्रेता मेळावे व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या माध्यमातून ती निर्यातदारांना सहाय्य करते.