एलसीबी, रामानंद नगर पोलिसांची कारवाई ; १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर येथे घरफोडी करून १६० ग्रॅम सोने आणि ४५० ग्रॅम चांदी असा एकुण १२ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपासादरम्यान, गुन्ह्यातील चोरीचे सोने वितळविणाऱ्या चौघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या या घरफोडीचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक संशयित मोपेडवर फिरताना आढळून आला. पुढील तपासानंतर तो गुन्हेगार साहील प्रवीण झाल्टे उर्फ साहील शेख खलील शेख (वय २०, रा. धुळे) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेतले. साहील झाल्टे हा अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार असून, मालेगाव येथे घरफोडी तसेच धुळे येथे खुनाचा प्रयत्न केल्याचे त्याच्या रेकॉर्डवर आहे. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली आणि चांदीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच, चोरीला गेलेले १६० ग्रॅम सोने त्याच्या साथीदारांच्या मदतीने वितळवण्यात आल्याचे उघड झाले.
साहील प्रवीण झाल्टे उर्फ साहील शेख खलील शेख (वय २०, रा. धुळे), पवनराज संजय चौधरी (वय २८, रा. हत्ती गल्ली, पारोळा), सागर वाल्मिक चौधरी (वय ३०, रा. आझाद चौक, पारोळा), केशव बाळू सोनार (वय ३६, रा. शाहूनगर, अमळनेर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी संशयितांकडून आरोपींकडून १२ लाखांचे सोने, ३५ हजारांची चांदी, ५० हजारांची दुचाकी, ५० हजारांचा आयफोन मोबाईल असा एकूण १३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेले १६० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४०७ ग्रॅम चांदीचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार पराग चौधरी यांना परत करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांच्या हस्ते हा ऐवज सुपूर्द करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित उपस्थित होते. कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, इरफान मलिक, सुशिल चौधरी, प्रवीण भोसले, पोना रेवानंद साळुंखे, उमेश पवार, रविंद्र चौधरी आणि प्रवीण सुरवाडे यांच्या पथकाने केली.