खरीप हंगामाच्या बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात जिल्हा प्रशासनाकडून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि. १६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत खतांच्या लिंकिंगचा मुद्दा चांगलाच गाजला. कंपन्या कृषी सेवा केंद्रांवर जबरदस्तीने खतांची लिंकिंग लादत असल्याच्या तक्रारीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कंपनी प्रतिनिधींना धारेवर धरले. खतांचे लिंकिंग केल्यास त्या कंपनीचेच लिंक तोडू, असा कडक इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजे पाच वर्षे मागे जाणे. खतांच्या लिंकिंगमुळे त्यांना जादा पैसे मोजावे लागतात, त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही लिंकिंग सहन केले जाणार नाही,असे ते म्हणाले. बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विनोद तराळ यांनी बैठकीत कंपन्यांकडून कृषी केंद्रांवर लिंकिंगसाठी केला जाणारा दबाव मांडला. यावर मंत्री पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, खतांच्या विक्रीसाठी लिंकिंग करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही.
बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी व कंपनी प्रतिनिधींना शोकॉज नोटीस पाठवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात वादळामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कानळदा ते भोकर दरम्यान ६०० विद्युत पोल पडले आहेत. १० ते १५ टक्के काम अपूर्ण असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील ८६ महसूल मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये हवामान यंत्र बसवण्याचे काम प्रलंबित असून ते लवकरच पूर्ण केले जाईल. रावेर क्लस्टरसाठी ३५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७.६९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असून त्यापैकी ५.०५ लाख हेक्टरवर कपाशी लागवड होणार आहे. यासाठी ८.५ लाख बियाण्याची पाकिटे उपलब्ध आहेत. बनावट बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १५ तालुकास्तरीय व १ जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे. गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(केजीएन)शेतकऱ्यांसाठी तक्रारी नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक १८००२३३४००० कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात कापसाच्या तुलनेत सोयाबीन व मक्याचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. लिंकिंगच्या मुद्द्यावर येत्या २१ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.