मानधनात अल्पशी वाढ केल्यामुळे संतप्त
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आरोग्य सुपरवायझर तथा गटप्रवर्तक यांना १४ मार्च २०२४ च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने फक्त १ हजार रुपये मानधन वाढ केल्याने गटप्रवर्तक हे सरकारच्या विरोधात गेल्या महिन्यापासून संतापलेल्या आहे. या अन्यायाच्या विरुद्ध गुरुवारी दिनांक २५ रोजी आयटकने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले.
विशेष म्हणजे आरोग्य अभियान अंतर्गत ह्या सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात त्यांना निम्न मानधन आहे. गेल्या १८ जुलै रोजी त्यांनी जिल्हाधिकारी यांना आंदोलनाद्वारे निवेदन देऊन जेलभरोचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्याचा इशारा दिला होता. परंतु गांधी उद्यानाजवळ आंदोलकांची जमवाजमव चालू असताना जिल्हा पेठ पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना जागेवरच दुपारी पाऊण वाजता अटक केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा गटप्रवर्तकांनी निषेध केला.
आंदोलकात आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन, सुरेखा साळुंखे, सुनिता ठाकरे, सुवर्णा न्हावी, रूपाली महाजन, धनश्री बडगुजर, छाया मोरे, एन वी वाघ, कविता सरोदे, संगीता पाटील, सुनयना चव्हाण, ज्योती चौधरी, प्रियंका माळी, अपेक्षा माळी, मनीषा पाटील, विजया देशमुख, सारिका पाटील तसेच सादिक टेलर आदीसह चोपडा, जळगाव धरणगाव, एरंडोल, बोदवड, जामनेर, भुसावल तालुक्यातील आंदोलकांचा समावेश होता. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला डीवायएसपी संदीप गावित यांनी भेट देऊन आंदोलकांच्या प्रश्नांची माहिती घेतली. दोन तासानंतर सर्व अटक केलेल्यांना मुक्त करण्यात आले.