इंद्रप्रस्थ नगरात गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचा थाटात समारोप
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील केशर बाग परिसरामध्ये संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित चार दिवसीय महोत्सवाचा रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात समारोप झाला. भक्ती, शक्ती आणि चैतन्याच्या वातावरणात निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर ‘शेगावमय’ झाला होता.


गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. रविवारी संध्याकाळी श्रींच्या पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने परिसर निनादला. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक. डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या महिलांनी मिरवणुकीत शिस्तबद्ध सहभाग नोंदवला.
पुरुष, लहान मुले आणि स्त्रिया पारंपरिक पेहरावात दिसून आल्या, ज्यामुळे सोहळ्याला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली होती. ही शोभायात्रा इंद्रप्रस्थ नगरातील विविध कॉलनी व परिसरातून काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि रांगोळ्या काढून स्वागत केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष सोनावणे, सचिव गणेश शेळके, आणि उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. याप्रसंगी योगेंद्र पवार, राजेंद्र बडगुजर, सतीश वाणी, प्रकाश शेवाळे, डॉ. सोपान पाटील, सतीश भोसले, नरेंद्र पाटील, मनोज कपाते, राहुल पाथरवट, राजेश पाटील, वैभव जैन, हर्षा भोसले, छाया पाटील, प्रिया थोरवे, सुरेखा चव्हाण, वैशाली पाटील यांसह अनेक भाविक आणि स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महोत्सवाच्या सांगता प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांच्या अलोट गर्दीमुळे हा सोहळा जळगावकरांसाठी एक अविस्मरणीय भक्तीचा अनुभव ठरला.









