आपण बाहेरचे युद्ध नव्हे तर अंतर्गत युद्ध जिंकायला हवे. जो इंद्रीय व मनावर नियंत्रण मिळवितो तोच खरा साधक म्हणायला हवा. कुणीही मन व इंद्रीय यांच्या आधीन होऊ नये. जो इंद्रीय, मनाचा दास बनतो तो बंधनात अडकतो. हा मानव जन्म हा आत्मशुद्धीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेला आहे. परंतु आजच्या मानवाने साधनालाच साध्य समजलेले आहे त्यामुळे आज जे काही घडते ते चुकीचे घडते असे मौलीक विचार शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकां समोर व्यक्त केले.
या संदर्भात अत्यंत चपखल उदाहरण देऊन त्यांनी समजावून सांगितले. रस्त्याने पाच पोलीस आणि एक व्यक्ती जात होते. मुलाने वडिलांना उत्सुकते पोटी हा काय प्रकार आहे असे विचारले त्यावर वडिलांनी उत्तर दिले की, हे नेते आहेत व त्यांच्या सेवेत पोलीस आहेत. जरा वेळाने एक व्यक्तीला घेऊन पाच पोलीस रत्याने जात होते. त्यावर मुलाने हा नेता आहे का? असे विचारले… बेटा हा बेड्या घेतलेला चोर आहे व त्याला ते घेऊन जात आहेत म्हणजे पाच पोलीस यांच्या आधीन तो चोर आहे. पाच इंद्रियांवर आपले नियंत्रण हवे, इंद्रीयांचे आपल्यावर नियंत्रण नसावे असा मोलाचा सल्ला त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून दिला.
सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास, दृढनिश्चय, साहस आणि उत्साह हे चार सूत्र आवश्यक आहे. असफलतेच्या मागे सफलता असते. असफल झाले तर नाऊमेद होऊ नये. अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक १७ वेळा हरले होते; परंतु त्यांनी हार मानली नाही. सफलतेसाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. याबाबतचे उदाहरण देखील परमपूज्य श्री. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी उपस्थितांना दिले.