रावेर न्यायालयाचा निर्णय
रावेर (प्रतिनिधी) :- व्यापार करण्यासाठी पत्नीने माहेरून ५० हजार रुपये न आणल्याने तलाक देणाऱ्या पतीस दोन वर्ष कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा रावेर न्यायालयाचे न्या.अनंत बाजड यांनी गुरुवारी २५ जानेवारी रोजी सुनावली.
शेख हसन शेख सत्तार (३०, रा.चिनावल, ता.रावेर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. गुरांचा व्यापार करण्यासाठी पत्नीने माहेराहून ५० हजार रुपये हुंडा म्हणून आणावा यासाठी हसन हा पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण करीत होता शिवाय जीवे मारण्याची धमकी देत त्याने तीन वेळा तलाक म्हणून बेकायदेशीर घटस्फोट दिला. या प्रकाराबाबत हसनची पत्नी तबस्सुम नाज हिने सावदा पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यावरून मुस्लीम महिला संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सात जणांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदार, पंच तपासाधिकार्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर न्या.अनंत बाज यांनी शेख हसन यास दोन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा तथा दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास सावद्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुरेश अढायके यांनी केला. सरकार पक्षातर्फे अॅड.एन.डी.तायडे व अॅड.श्रीकृष्ण दुट्टे यांनी काम पाहिले. पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल संजय बावस्कर यांनी काम पाहिले.