जळगाव शहरातील रामदास कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका खाजगी जिममध्ये सकाळी व्यायाम करून झाल्यावर पाणी पीत असताना तरुणाला हृदयविकाराचा जोरात झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. १६ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोहित जगदीश जाखेटे (वय ४२, रा. लेक साईट, मेहरून तलाव परिसर जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. तो लेकसाईट भागात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ यांच्यासह राहत होता. विविध व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी दि. १६ मे रोजी सकाळी पावणे सात वाजेला तो रामदास कॉलनी परिसरातील आकार जिम येथे व्यायाम करण्यासाठी गेला होता. (KCN) त्या ठिकाणी व्यायाम झाल्यानंतर पाणी पीत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा जोरात झटका आला.
त्यानंतर त्याला सोबतच्या तरुणांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषित केले.(KCN) यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान, या घटनेमुळे व्यापारी वर्गाने शोक व्यक्त केला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमध्ये कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.