जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिरसोली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री एका हॉटेलमध्ये अज्ञात टोळक्याने धुडगूस घातला. हॉटेल शुगर ॲण्ड स्पाईसीमध्ये जेवणानंतर या टोळक्याने अचानक तोडफोड सुरू केली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
काही तरुण हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि बघता बघता तोडफोडीला सुरुवात केली. या वेळी त्यांनी हॉटेलमधील टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते. जाताना या टोळक्याने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील सोबत नेला, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे अधिक कठीण झाले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती.