जळगाव ( प्रतिनिधी )आम्ही क्राईम ब्रॅन्चचे पोलीस असून रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५० वर्षीय प्रौढाला रस्त्यात अडवून त्यांच्याकडून २० ग्रॅम सोन्याची चैन आणि ३ हजार रोख घेऊन पल्सरवर आलेल्या दोन भामट्यानी तेथून पळ काढल्याची घटना आज ११ वाजेच्या सुमारास पिंप्राळा भवानी मंदिराजवळील रोडवर घडली असून दुसऱ्या घटनेत आपल्या मित्राकडे दुचाकीने जाणाऱ्या व्यक्तीला अडवून त्यांनाही पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या जवळील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या घेऊन दोघांनी पल्सरवर पोबारा केल्याची घटना हॉटेल क्रेझी होम समोर घडली . रामानंद नगर पोलीस त्या दोघे तोतया क्राईम ब्रँचच्या भामट्यांचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पिंप्राळा येथील रहिवाशी प्रदीप पुरूषोत्तम सोमाणी वय ५१ हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास भवानी मंदिराजवळून जात असतांना आम्ही क्राईम ब्रॅन्चचे पोलीस असून बनावट ओळखपत्र दाखवून अंगावरील २० ग्रॅम वजनाची सोन साखळी आणि ३ हजार रोख रक्कम पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यानी पळ काढला. यानंतर लगेच दुसऱ्या घटनेत अयोध्यानगर येथील रहिवाशी आणि रेमंड येथे सुपरवायझर असलेले सुनील पितांबर चौधरी हे आपल्या आजाराची असलेल्या मित्राला पाहण्यासाठी जात असताना इच्छादेवी ते आकाशवाणी दरम्यान असलेल्या हॉटेल क्रेझी होम समोर ११ :३० वाजेच्या सुमारास काळ्या पल्सरवरून आलेल्या दोघांनी थांबा कुठे फिरत आहात असे सांगून आम्ही पोलीस भासवून या परिसरात चोरी झाली आहे , आम्ही याचा तपास करीत असल्याचे सांगून १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन , ८ आणि ५ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या घेऊन दोघे काळ्या पल्सरवरून पसार झाले.
दोन्ही ठिकांणांच्या घटनेची माहिती कळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, एपीआय संदीप परदेशी, संजय धुमाळ, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. दोन्ही तक्रारदारांनी दिलेल्या वर्णनानुसार दोन चोरटे आणि काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकींचा वापर झाल्याचे समजते. दरम्यान तक्रारदार व्यक्तींच्या वर्णनानुसार पोलीस शोध घेत आहे. याबाबत रामानंद नगरला अज्ञात दोन चोरट्यांबाबत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.