राज्य शासनाच्या गृह विभागाचे महासमादेशकांना पत्र
जळगाव (विशेष वृत्तान्त) : राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. मात्र या विषयाला सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने स्थगिती दिली आहे. विविध नवीन योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर पडणाऱ्या भारामुळे आता होमगार्डला भत्तेवाढ देण्यास शासन नकारघंटा वाजवत आहे.
याबाबत गृह विभागाचे कार्यासन अधिकारी मीनाक्षी कऱ्हाडे यांनी राज्याचे होमगार्ड विभागाचे महासमादेशक यांना गुरुवारी दि. १ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि समाजातील सर्व दुर्बल घटकांना आर्थिक मदत व प्रगतीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी राज्यावरील आर्थिक भार फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.(केएसएन)त्यामुळे विभागाने सादर केलेला प्रस्ताव काही काळासाठी पुढे ढकलण्याबाबत किंवा सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे अभिप्राय वित्त विभागाने दिले आहेत.
सबब, राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्यात येत आहे, असेही शेवटी पत्रात म्हटले आहे. यामुळे होमगार्ड बांधवांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तर आहे त्या महत्वाच्या प्रस्तावांवर विचार करून आर्थिक निधी देण्याऐवजी नवीन योजना आणून शासन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात नाराजी निर्माण करीत आहे, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून उमटत आहेत.