मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला.


मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्या जगावर, देशात आणि राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच 7 डिसेंबर 2020 ला अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.







