जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव येथील विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी विशेषतः आंतरवासीता प्रशिक्षणार्थी आणि सफाई कामगार यांच्यासाठी मोफत कावीळ लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांनी केले. तसेच या कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. सुनयना कुमठेकर, डॉ. दिपक वाणी इत्यादी उपस्थित होते.
हिपॅटायटीस बी किंवा पांढरी कावीळ ही एक जागतीक आरोग्य समस्या असून जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जवळपास ३० कोटी लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार मुख्यतः दुषीत रक्ताव्दारे पसरतो. आरोग्य संस्थेत काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरॉमेडीकल स्टॉफ आणि सफाई कामगार यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी कावीळ लसीकरण हा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. जोतीकुमार बागूल, प्राध्यापक व अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग यांना लस देवून करण्यात आले. या शिबीरात डॉक्टर्स, आंतरवासीता, एम.बी.बी.एस. विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून कावीळ लसीकरण करून घेतले.