जळगाव (प्रतिनिधी) – जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याचे येथील स्वातंत्र्य चौक व बेंडाळे चौकात बॅनर लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोना उमेश पाटील यांनी म्हटले आहे की, शिवाजी धुमाळ, छगन तायडे यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना शहरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य चौकातील मोहिते बिल्डिंगवर आणि बेंडाळे चौकात चेतन आळंदे याचे गुरुवारी बॅनर लागलेले होते. सदर चेतन उर्फ चिंग्या हा एका गुन्ह्यात नाशिकच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याचे बॅनर राईट मीडियाच्या माध्यमातून मनोज शालीक चौधरी रा.तुकारामवाडी याने लावल्याचे पोलिसांच्या चौकशीत दिसले.
बॅनर लावण्यासाठी आवश्यक असणारी संबंधित प्राधिकरणाची कुठलीच परवानगी देखील घेतली नसल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण करून आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी बॅनर लावले म्हणून मनोज चौधरी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.