कोईम्बतूर ( वृत्तसंस्था ) – तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर ते तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. अपघातामध्ये आता हेलिकॉप्टरमधील १४ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
अपघातातील एका व्यक्तीवर अजूनही उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बिपिन रावत यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे देशभरात त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. या अपघातासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने बचावकार्य हाती घेतलं होतं.
जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये सीडीएस बिपिन रावत यांचा देखील समावेश आहे. १४ पैकी १३ प्रवाशांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल हे प्रवास करत होते.
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यात येणार आहे.