जळगावात तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : येथील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असणाऱ्या अॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याला बँकेत कामावर असताना अचानक प्रकृती खराब झाल्याने घरी जावे लागले. मात्र त्याला हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच या तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस घटनेची माहिती घेत होते.

अजितसिंग धनसिंग गिरासे (वय ३८, रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव,मूळ डोंगरगाव ता. शहादा जि. नंदुरबार) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. ते यापूर्वी आयसीआयसीआय बँकेत कर्मचारी होते. फेब्रुवारी २०२४ ला ते अॅक्सिस बँकेत एरिया सेल्स मॅनेजर म्हणून रुजू झाले होते.(केसीएन) दरम्यान, शनिवारी दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी जाण्यासाठी निघाले होते.
मात्र घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा जोरात झटका आला. त्यांना सुरुवातीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. रुग्णालयात नातेवाईक व मित्रांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलीस घेत होते.









