जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध धरणांच्या परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाला असून या पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांसह तेरापैकी अकरा मध्यम प्रकल्पांतही १०० टक्के उपयुक्त साठा झाल असून हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ३६. २७ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणाचे २ दरवाजे अर्धा मीटर, गिरणाचे २ दरवाजे ०. ६० मी, तर वाघूरचे २ दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०. ४० टीएमसी इतका आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात ९.०० टीएमसी, गिरणा १८.९ टीएमसी, तर वाघूर धरणात ८.७८ टीएमसी इतका उपयुक्त साठा असून ही धरणे १०० टक्के भरुन वाहत आहेत.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये १९८.६० दलघमी म्हणजेच ७.०१ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात १७५.६८ दलघमी म्हणजेच ६.२० टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये १०० टक्के उपयुक्त साठा आहे. तर गुळ ८६.३६ टक्के, व भोकरबारी धरणात ६८.४० टक्के उपयुक्त साठा आहे.







