भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी): वयोवृद्ध डॉक्टर एटीएममधून पैसे काढत असताना चोरट्यांनी पिन क्रमांक पाहत व एटीएम कार्डची अदलाबदल करीत मुक्ताईनगरातील एटीएममधून २० हजार रुपये काढले. ही घटना १९ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरजवळील स्टेट बँकेच्या एटीएममधून घडली.
जामनेर रोडवरील आनंदनगरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये १९ रोजी संध्याकाळी सहा वाजता ६३ वर्षीय डॉ. गौतम नामदेव खरे हे पैसे काढत असताना तेथे दोन अनोळखी उभे होते. त्यांनी हातचलाखी करीत पैसे लंपास केले.
डॉ. खरे यांना मेसेज आल्यावर त्यांना आपल्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार केल. तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत देशमुख करीत आहे.