महाराष्ट्र, झारखंड प्रतिक्षेतच ; मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज शुक्रवारी दि. १६ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांबाबत निवडणूक जाहीर करून त्याबाबत सविस्तर माहिती दिली. तर महाराष्ट्रासह इतर ३ राज्ये प्रतिक्षेतच राहिली असून विधानसभा निवडणूक आज जाहीर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी असा प्रश्न विचारणं सोपं आहे, असं म्हटलं. महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत ३ नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची २६ नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे. सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं झालेली नाहीत.अनेक सण आहेत, गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.
हरियाणा विधानसभेतील सदस्यसंख्या ९० इतकी आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपणार आहे. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि जेजेपीनं सत्ता स्थापन केली होती. हरियाणात एनडीएकडे ४३ आणि इंडिया आघाडीकडे ४२ आमदारांचं संख्याबळ आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४, दुसऱ्या टप्प्यात २६ आणि तिसऱ्या टप्प्यात ४० मतदारसंघात मतदान पार पडले.
पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होईल. हरियाणातील ९० जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडेल. मतदान १ ऑक्टोबरला होईल. तर, मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सोबतच जाहीर झाली होती. मात्र, यावेळी हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांची निवडणूक आज जाहीर होणार आहे. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूक सोबत जाहीर होऊ शकते.