अखेर पोलिसांनी पकडले रंगेहाथ, रावेर शहरातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : शहरातील व्यापाऱ्यास गुंगीचे औषध पाजून त्याच्याशी अश्लील विडिओ तयार केला. एवढेच नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ वर्षात तब्बल ११ लाखांची खंडणी चोपड़ा तालुक्यातील लोणी अडावद येथील महिलेने वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुन्हा १ लाख रुपये घेण्यासाठी १९ रोजी बुधवारी ही महिला शहरात पीडित व्यापाऱ्याच्या कार्यालयात आली असता सापळा रचत रावेर पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले.
सन २०१८ मध्ये जळगाव शहरात ४३ वर्षीय व्यापाऱ्याला त्याच्या चारचाकी कारमधून लिफ्ट मागून प्रतिभा हिरालाल पाटील हिने विमा एजंट असल्याची ओळख दिली. हळूहळू मोबाइलवर फुलवलेल्या मैत्रीतून चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथे तिच्या घरी भोजनासाठी बोलावून शीतपेयात काही तरी गुंगीचे औषध पाजून आपत्तीजनक व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याची घटना घडली. आपत्तीजनक व्हिडीओ पीडित व्यापाऱ्याच्या घरी व सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी देत ३० डिसेंबर २०२३ पासून १९ मार्चपावेतो एकूण ११ लाख रुपयांची खंडणी आरोपी महिलेने तिच्या स्वतःच्या व तिचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील (वय २१) याच्या खात्यात ऑनलाइन घेतली. दरम्यान, पीडित व्यापारी विकत असलेल्या शेतीचे बाजारमूल्य ५ कोटीपर्यंत असल्याची माहिती मिळताच या महिलेने पीडित व्यापाऱ्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या व्यापाऱ्याने तिच्याकडून पाच कोटी रुपये हातउसने घेतल्याच्या खोट्या पावतीचा नोटरी करारनामा २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करून घेतला.
त्या पाच कोटींपैकी १ लाखाची मागितलेली खंडणी घेण्यासाठी प्रतिभा ही व्यापाऱ्याच्या रावेर येथील कार्यालयात आली असता, रावेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, महिला फौजदार प्रीती वसावे, महिला पो. कॉ. माधवी सोनवणे, महेश मोगरे, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकून पीडिताकडून एक लाखाची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. ही कारवाई १९ मार्च रोजी दुपारी ३:४२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.