पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे पोळ्याच्या दिवशी बैलाचा दुचाकीला धक्का लागल्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
अंतुर्ली खुर्द येथे बैलपोळ्यानिमित्त बैलांना संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास गावात फेरफटका मारत असताना शेतकरी भाऊसाहेब नाना पाटील यांच्या बैलाचा अल्ताफ खान मेहबूब खान यांच्या दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे अल्ताफ खान याने शिवीगाळ केली. याचा जाब विचारल्याच्या रागातून अल्ताफ याने गल्लीतील युवकांना बोलावले. यावेळी बैलमालक भाऊसाहेब नाना पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. अल्ताफ मेहबूब खान, जुबेर अनिस खान, जुनेद अनिस खान, अकबर भिकन नजीर अमीन बाबू, अकबर खान यांच्यासह १८ जणांनी मारहाण केली.
यात अकबर वजीर खान, अल्ताफ मेहबूब खान यांनी रूपेश पाटील याच्या कपाळावर वार केला. भाऊसाहेब नाना पाटील यांच्या डोक्यात दगड लागून दुखापत केली. एका गटाकडून दुसऱ्या गटावर दगडफेक झाल्याने यात भाऊसाहेब पाटील यांचे डोक्यास जबर दुखापत झाली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आठ जणांना अटक करण्यात आली आहे.