भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुनसगाव-बेलव्हाय परिसरात बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बेलव्हाय ग्रामस्थांनी केली आहे.
गोविंदा श्रावण पाचपांडे (रा. बेलव्हाय ता. भुसावळ) यांनी निमगाव रस्त्यावर असलेल्या गुरांच्या वाड्यात बैलजोडी व गाय बांधली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्र प्राण्याने गायीवर हल्ला करून ठार मारले. सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना माहिती देण्यात आली. जितेंद्र काटे यांनी तलाठी व कुऱ्हा पानाचे वनविभाग कार्यालयात माहिती कळवली.
काही वेळानंतर वनविभागाचे विलास काळे व नरेंद्र काळे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. मयत गायीचे शवविच्छेदन कुऱ्हा पानाचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले यांनी केले. घटनेने शेतकरी भयभीत झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी, तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बेलव्हाय ग्रामस्थांनी केली आहे.