जळगावातील गुन्हेगाराला धुळे कारागृहात केले रवाना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील प्रांताधिकारी महेश सुधोळकर यांना एका हद्दपार गुन्हेगाराने थेट धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. मला हद्दपार का केले अशी थेट विचारणाच त्याने केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी धुळे येथील कारागृहात पाठविले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुषण रघुनाथ सपकाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जळगावात प्रांताधिकारी म्हणून महेश सुधळकर हे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम पाहतात. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सायकाळी ६ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत ते आपल्या निवासस्थान परिसरात असतांना पलीकडून त्यांना मोबाईलवर कॉल आला. पलीकडून बोलणाऱ्या भुषण रघुनाथ सपकाळे याने महेश सुधळकर यांना मला हद्दपार का केले अशी धमकी वजा विचारणा केली. याप्रकरणी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता महेश सुधळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला अदखलपात्र दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विठ्ठल पाटील करत आहेत.
दरम्यान, विविध पोलीस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय- ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहे. त्याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.