मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे आरोग्य विभागातील गटप्रवर्तकांच्या मानधनात लक्षणीय वाढ होणार आहे.
आरोग्य क्षेत्रात गटप्रवर्तकांना आशाताईंच्या कामावर पर्यवेक्षण ठेवणे आणि क्षेत्रीय भेटी घेणे आवश्यक असते. या महत्त्वपूर्ण कामांची दखल घेत, त्यांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाढीव मानधन एप्रिल २०२४ पासून लागू केले जाईल.
या वाढीव मानधनासाठी सुमारे १७ कोटी ५९ लाख रुपयांच्या वार्षिक खर्चाची व्यवस्था करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजुरी घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गटप्रवर्तकांच्या कामात प्रोत्साहन मिळेल आणि आरोग्य क्षेत्रातील सेवा अधिक प्रभावीपणे पार पाडता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.