सुमारे ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्याच्या मेहुणबारे हद्दीत गुटखा वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी 16 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा ट्रक न थांबता चालकाने थेट पलायन केले. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग सुरु ठेवत ट्रक जळगाव जवळ शिरसोलीपुढे पकडला. हा ट्रक नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून येत होता तसेच त्यातील ६६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस नाईक मनोज दुसाने यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून ती शुन्य नंबरने मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात येत आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मिळालेल्या गुप्त माहिती वरून मेहुणबारे येथे चाळीसगाव रोडवरील गिरणा नदी पुलाजवळ रात्री ११ वाजेच्या सुमारास सापळा लावलेला असताना ट्रक क्रमांक एम.एच.१८ एम. ०५५३ हा येताना दिसला. त्याचा पाठलाग केला असता तो ट्रक पळून गेला. मात्र त्याचा नियमित पाठलाग सुरू ठेवला. त्यानुसार हा ट्रक मेहुणबारे, पाचोरा मार्गे जळगावी जात होता. शिरसोली गावापुढं जैन कंपनीजवळ त्याला अडविण्यात पोलिसांना यश आले. त्यावेळी ट्रक चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी त्यांची नावे ट्रक चालक मसूद अहमद शब्बीर अहमद (वय ३८) रा. संगमेश्वर, मौलाना इसाक चौक, मालेगाव आणि क्लिनर मोहम्मद अय्युब दिन मोहम्मद (वय ५६) रा. दादामिया का तकिया अशी सांगितली.
या ट्रकमध्ये पांढऱ्या आणि निळ्या गोणपाटात मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला आहे. यात गुटखा, सुगंधित सुपारी, पानमसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थ आढळून आले आहेत. गुटख्याचा माल जास्त प्रमाणात असल्याने तो ट्रक हा जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणून त्यातील पोते उतरविण्यात आले. त्यांतील मुद्देमाल मोजण्यात आला. ५७ लाख ८६ हजार रुपयांचा गुटख्याचा माल आणि ९ लाखांचा ट्रक असा ६६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटख्याच्या मालातील काही नमुने घेण्यात आले असून ते विश्लेषणासाठी पाठविण्यात येत आहे. सदरचा साठा हा अन्न व औषध प्रशासन यांचेकडेस जमा करण्याची दक्षता ठेवली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, महेश पाटील, प्रवीण हिवराळे यांनी कारवाई केली आहे. ट्रक जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणला तेव्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनायक लोकरे,पीएसआय विशाल सोनवणे, व कर्मचारी, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक अकबर पटेल व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मेहुणबारे पोलीस स्टेशन च्या हद्दीत हा गुटखा पकडला असताना देखील तेथे या गुन्ह्याची कुठलीही नोंद करण्यात आली नाही. त्याचबरोबर या ट्रक चालकशी किंवा व्यापारीशी संगनमत करून ट्रक सोडून देण्याचे ठरले असावे अशा संशयावरून जळगावला पोलिसांच्या सुरक्षा निगराणीत ट्रक पोहोचवला जात असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. दरम्यान राज्यांमध्ये अवैध गुटखा, अवैध धंदे यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून या धंद्यांना नेमके कोणाचे अभय आहे हे आता समोर आले पाहिजे अशी मागणी केली. तसेच गुटखा हब होण्याच्या मार्गावर चाळीसगाव असून अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले असल्याचा आरोप दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सकाळी पोलीस निरीक्षक अकबर पटेल आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात माझी फिर्याद घ्या या कारणावरून वाद झाला. यामध्ये पटेल यांनी सांगितले की, हा गुन्हा आमच्याकडे दाखल होऊ शकत नाही. मात्र फिर्याद कोठेही घेता येते असे सांगत मंगेश चव्हाण यांनी फिर्याद घ्याच असा आग्रह धरला होता.