जळगावातील तुकारामवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री पुन्हा त्याच हल्लेखोरांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०२२मध्ये अरुण गोसावी आणि सुरेश ओतारी यांना काही तरुणांनी जबर मारहाण केली होती. मारहाणीत सुरेश ओतारी यांचा मृत्यू झाल्याने पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात पाच जणांना अटकदेखील करण्यात आली होती. ६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास अरुण गोसावी हे घरी असताना संशयित आरोपी भूषण माळी उर्फ भाचा, आकाश ठाकूर उर्फ खंड्या, पवन बाविस्कर उर्फ बद्या, सचिन चौधरी उर्फ टिचकुल्या, आकाश मराठे उर्फ ब्रो, चेतन सुशीर उर्फ बटाट्या यांनी गोसावी यांच्या घरावर हल्ला केला. सर्वांनी घरावर दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी साहित्याची तोडफोड केली. यावेळी भूषण माळी याने ‘तू कसा आमच्याविरुद्ध केस चालवतो, तुला बघतो, आज तुझा मर्डरच करतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वजण घराच्या पहिल्या मजल्याच्या दिशेने जात होते.
हल्लेखोरांच्या हातात कोयता आणि लाठ्याकाठ्या असल्याने अरुण गोसावी हे मागील दरवाजाने निघून गेले. संशयितांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील साहित्याचीदेखील तोडफोड केली. याप्रकरणी अरुण गोसावी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भूषण माळी, आकाश ठाकूर, पवन बाविस्कर, सचिन चौधरी, आकाश मराठे, चेतन सुशिर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि महेंद्र वाघमारे करीत आहेत.