जळगाव (प्रतिनिधी) – शहरात गुन्हेगारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून कुटुंबियांसह जेवण करण्यास आलेल्या पोलिसाला हॉटेलमध्ये मारहाण करण्याची मजल गुन्हेगारांनी गाठली आहे. यामुळे पोलीस दलापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच एका हॉटेलमध्ये कुटुंबियांसह भोजनासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्यांला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार असून जिल्हापेठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पाटील रा. पोलीस वसाहत, जळगाव हे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून मंगळवारी २८ मार्च रोजी रात्री गणेश पाटील कुटुंबियांसोबत नवीन बसस्थानकजवळील हॉटेल रिगल येथे जेवणासाठी गेले होते. त्यांच्या बाजूच्या टेबलावर कृष्णा नरेंद्र पिंगळे (वय-२०) रा. रायसोनी नगर, भावेश अनिल चौधरी (वय-१९) रा. गणेशवाडी, मयंक राजेंद्र चौधरी (वय-२७) आणि गोपाल नवल असे चार जण बसले होते. यावेळी चौघांपैकी एकाने पाण्याची बाटली मारून फेकली. त्यावरून गणेश पाटील हे चौघांना समजविण्यास गेले. चौघांनी गणेश पाटील यांच्याशी धक्काबुक्की करत जुन्या वादातून मारहाण करायला सुरुवात केली. तू आम्हाला यापुर्वी अटक केली होती, आता तू एकटा सापडला आहे, तू काहीच करून शकत नाही अशी धमकी देवून यातील एकाने फायटरने तोंडावर मारहाण करून दुखापत केली.
यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून कृष्णा पिंगळे, भावेश चौधरी आणि मयंक चौधरी यांना जागेवरच अटक केली तर गोपाल नवल हा फरार झाला आहे. फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्क्क पोलिसालाच मारहाण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.