श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण संपन्न !
धरणगाव ( प्रतिनिधी ) – ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, मूलभूत गरजांना प्राधान्य आणि सर्वसामान्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा विकास हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील विविध गावांत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.*

ते पुढे म्हणाले की, “गावाचा सर्वांगीण विकास झाल्यावरच गावाची खरी ओळख निर्माण होते. ही ओळख भक्कम करण्यासाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय, चांगले रस्ते, स्मशानभूमी, शैक्षणिक परिसर सुशोभीकरण, मंदिर परिसर विकास या सर्व सुविधा तळागाळात पोहोचवण्यावर आमचा नेहमीच भर आहे. ‘गाव तिथे स्मशानभूमी’ हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात आहे. जनसुविधा योजनांतर्गत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हाच आमचा खरा उद्देश आहे,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितले.
धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे या भागांत विविध विकासकामांचे भूमिपूजन व काही ठिकाणी लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. एकूण सुमारे ८ कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात झाली असून अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
या कामांचे झाले भूमिपूजन, लोकार्पण
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विवरे – जांभोरे–सार्वे खुर्द ते बिलखेडा या १०.५० किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण; यात २७ ठिकाणी पाईप व काँक्रीट मोऱ्या तसेच ४१० मीटरचे काँक्रीटीकरण होणार आहे (६ कोटी ५२ लक्ष), धरणगाव ते सार्वे या १ किमी शेतरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण (४९ लक्ष), श्यामखेडा येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळा परिसर सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे (१० लक्ष), बिलखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम (२० लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात काँक्रीटीकरण व सभागृह बांधकाम (१ कोटी) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तर आमदार निधीतून जांभोरे येथे दोन प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण (२० लक्ष), बिलखेडा येथे महानुभव गल्लीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण व सांत्वन शेड बांधकाम (२१ लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता या कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी केले, तर आभार माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले. यावेळी प्रत्येक गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महिलांनी औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.










