मंत्री गुलाबराव पाटलांनी गाजविली धरणगावातील सभा
धरणगाव (प्रतिनिधी) : मायबाप जनता हो, जर मी चांगले काम केले असेल तर मला आशीर्वाद द्या. भरभरून कामे मागील दहा वर्षात करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे असे सांगून, लाख करो तुम बदनाम, मेरा नाम ना मिटा पाओगे, क्यूकी मेरे चाहनेवाले मेरा नाम कागज पे नही, दिल पे लिखते है..! अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिर सभेत ते मंगळवारी संध्याकाळी बोलत होता.
यावेळी खा. स्मिता वाघ, मंत्री गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ पाटील, प्रतापराव पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, पी. सी. पाटील, आरपीआयचे अनिल अडकमोल उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पूर्वी धरणगाव हे दोन गावांचे राजधानीचे शहर होते. आम्ही १३०० मुलींना सायकल वाटप केल्या. विकासकामे केली. निम्न तापी प्रकल्प , नारपार, भागपूर या सर्व प्रकल्पांना निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सुंदर रस्ते झाले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्याची भरभरून कामे केली.
यानंतर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. उठले सुटले धरणगावचे पाणी काढत बसतात. अरे बाबांनो, तेथे प्रशासक आहे. निवडणूक झाली कि, पहा या गुलाबरावांचा जोर किती आहे ? असे सांगून, जनतेला मी मंत्री वाटत नाही. कारण मी सर्वसाधारण आहे. तुमचाच भाऊ आहे मी… एका तरी माणसाने सांगावे कि, गुलाबरावांनी त्रास दिला. मागील पंचवार्षिकला मी ज्यांच्याशी लढलो ते माझ्यासोबत आहे असे सांगितले. विरोधक उमेदवाराला उद्देशून, तुम्ही जळगाव शहरातील राहणारे आहे आणि जळगाव ग्रामीणमध्ये हक्क दाखविता काय ? हे मजूर फेडरेशनमध्ये पैसे कमावतात अन् गुलाबरावावर बोलतात हे योग्य आहे काय ? तेथे एकपण मजूर नाही सगळे स्कॉर्पिओ वाले आहे. मजूर कोण असतो ? जो बीपीएलधारक आहे. हा कसला मजूर ? अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले. शेवटी त्यांनी, मेरे पास न बाप कि दौलत है, न दादाजी कि दौलत है.. मेरे पास केवल बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद कि दौलत है…असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.