नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संपर्कात ; सशस्त्र दल व लष्कराकडून मदतकार्य सुरू !
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वरणगाव येथील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात होऊन त्यात १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांसह नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधत जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
नेपाळ येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी बस अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तळवेल या गावातील ४१ भाविक या बसमध्ये होते, अशी माहिती समोर आली आहे. यात वरणगाव येथील माजी नगरसेवकांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील बसमध्ये होतं. पूर्ण बस ही जळगाव जिल्ह्यातील भाविकांचीच होती, अशी माहिती मिळाली आहे. जळगावमधून ११० जण नेपाळला गेले होते. या अपघातात चालक आणि वाहकांसह १४ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघात जिथे घडला ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधत तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेपाळच्या सशस्त्र दल व लष्कराकडून मदतकार्य सुरू झाल्याची माहिती ना. पाटील यांना स्थानिक प्रशासनाने दिली आहे. जळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांना अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्वतः देखील नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संपर्कात असून जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ना. पाटील हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. तसेच महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.