जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान रावेर येथून परत येत असतांना अनिल देशमुख यांनी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला भेट दिली. फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी गृहमंत्री यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ.केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, कॉलेजचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गृहमंत्र्यांनी कॉलेजची पाहणी करून उपलब्ध असणार्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या कालखंडामध्ये डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे उपचार हे कोवीड आणि नॉन कोवीड रुग्णांसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले असून याचे त्यांनी कौतुक केले. विशेष करून दोन्ही प्रकारच्या रुग्णांना उपलब्ध असणाऱ्या स्वतंत्र सुविधा पाहून त्यांनी डॉ. उल्हास पाटील यांचे कौतुक केले.