जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील प्रकार, अधिकाऱ्यांवर संताप
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वसंतवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. १९ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. या ग्रामसभेची माहिती ग्रामपंचायतीचे कार्यकारिणी तसेच गावातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुचनापत्राद्वारे कळविण्यात आली होती तसेच गावांत देखील दवंडी देऊन कळविण्यात आले होते. मात्र २१०० ते २२०० लोकसंख्या वस्ती असलेल्या गावातुन ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मिळुन केवळ ३२ लोकांची उपस्थिती होती. यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
वसंतवाडी सरपंच विनोद पाटील व ग्राम अधिकारी बबन वाघ यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावातील रेशन दुकानदार, पोलीस पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी,म्हसावद पोलीस दुर क्षेत्र,पशु वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका २,अंगणवाडी सेविका २,प्रा शाळा मुख्याध्यापक, वनरक्षक, तलाठी, महावितरण कार्यालय (जळके) वसंतवाडी, रोजगार सेवक असे एकूण २५ जणांना सुचना पत्राद्वारे तसेच मेसेज करुन दिली होती. मात्र आरोग्य विभागाचे पी.डी.रगरे,अंगणवाडी सेविका उज्वला पाटील, कमल चव्हाण,आशा सेविका गोजर पाटील, सरीता पाटील, प्रा.शाळा मुख्याध्यापिका भारती सोनार उपस्थित होते. बाकीच्या सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व गावातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे भाग असलेले दुकानदार एवढेच काय तर ग्रामपंचायतीने नेमणूक केलेला रोजगार सेवक यानेही ग्रामसभेकडे पाठ फिरवली आहे.
या गावातील उपस्थित नागरिकांमध्ये अनुपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्य बद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्याचे समजते. तसेच बऱ्याच वेळा कोरम पुर्ण होत नसल्याने सभा तहकूब करण्याची वेळ येत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. अनुपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर ग्रामपंचायतीने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करावी अशीही चर्चा होती. या सभेला सरपंच विनोद पाटील, सदस्य माधव बोरसे, प्रदीप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर चव्हाण, पाणी पुरवठा कर्मचारी उमेश पाटील तसेच सागर ठोसरे, रविंद्र पाटील, बाबुलाल राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्राम अधिकारी बबन वाघ यांनी आजची ग्रामसभा सरपंच विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कोरम पुर्ण न झाल्याने आजची ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याचे व तहकूब ग्रामसभा दि. २५ ऑगस्ट रोजी वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे १० वाजता होईल असे अध्यक्षांच्या परवानगीने सांगितले.