यावल तालुक्यातील दहिगाव येथे तरुणाचा प्रताप
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात एका तरुणाने कारण नसताना कार्यालयाची नासधूस केली व कर्मचाऱ्यांना तसेच सरपंच, उपसरपंच यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिगाव येथील हर्षल उर्फ कालू विश्वास पाटील या तरूणाने दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दहिगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात कारण नसताना जाऊन तिथे असलेले ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र शिवाजी पाटील यांना खुर्चीवरून ताणून मारहाण केली. सरपंच, उपसरपंच कोठे गेले ? त्यांना व्यवस्थित काम करता येत नाही ? असे बोलून शिविगाळ करून मारहाण केली.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील नऊ नंबर रजिस्टर आणि टेबल खुर्चीची मोडतोड केली व सरपंच, उपसरपंच देविदास, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक राजाराम पाटील, पाणीपुरवठा कर्मचारी सुधाकर गोविंदा पाटील, विजय शालिग्राम पाटील पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील अशांना अश्लील शिवीगाळ केली. धमकी देत आत्महत्या करून तुमचे नावे टाकून तुम्हाला फसवेल असा दम दिला अशा आशयाची फिर्याद रवींद्र शिवाजी पाटील यांनी दिलेवरून यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.