दोन्ही जिल्हाप्रमुखांची भूमिका ठरली महत्वाची
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- जळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान हे महाविकास आघाडीकडे जातील अशी अटकळ होती. मात्र मराठा समाजातील अनेक नेते हे शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. यात शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी सर्व समाज खंबीरपणे उभा राहिल्याचे त्यांना मिळालेल्या ५९ हजार मताधिक्यावरून दिसून येत आहे. निवडणुकीत मराठा समाजाची मते महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर यांच्याकडे जातील असे म्हटले जात होते. मात्र समाजाचे नेते मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी खंबीरपणे साथ दिली.
प्रत्येक सभा त्यांनी गाजवून सोडल्या. सातत्याने मराठा समाजाचे नेते व समाजबांधव हे गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी राहिले. जातीपातीचे राजकारण होऊ दिले नाही. केवळ गुलाबभाऊंची विकासकामे आणि मंत्रिपदावर असताना पालकमंत्री म्हणून केलेले नेतृत्व यामुळे जनतेने त्याना निवडून दिले आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.