ग्राहक न्यायालयाचा निर्णय, पारोळ्याच्या तरुणाला दिलासा
जळगाव ( प्रतिनिधी ) – अवाजवी बिल दिल्यानंतर ग्राहकाने सीपीएल लेजरचा डाटा मागितला. मात्र पारोळ्यातील वीज कार्यालयाने हा डाटा देण्यास टाळाटाळ केली. अवाजवी बिलाची पडताळणी केल्यानंतर नियमितपणे रिडींग घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्राहक मंचाने २० हजार ४९० रुपयांचे बिल रद्द ठरवत तक्रारदार ग्राहकाला १५ हजारांची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.
कुंदन देवाजी पाटील या ग्राहकाने ७ जानेवारी २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. नियमितपणे विज बिलाचा भरणा केला असताना २० हजार ४४८ रुपयांचे बिल आकारण्यात आले होते. या बिलावर मागील रिडिंग शून्य तर चालू रिडींग १५३३ दर्शविण्यात आले होते. त्यांनी बिलाविषयी पारोळा कार्यालयात विचारणा केली असताना बिलाच्या सविस्तर नोंदी देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती.
ग्राहक मंचाच्या अध्यक्षा सी. आर. सपके, सदस्या प्रतिभा पाटील, एस. ए. मणिक यांनी दि.१० ऑक्टोबर रोजी त्यांच्या तक्रारीवर सुनावणी केली. वीज कंपनीने आकारलेले वीजबिल रद्द ठरवून दुरुस्त बिल द्यावे, तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रासापोटी १० हजार आणि खर्चापोटी ५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदाराच्यावतीने अॅड. हेमंत भंगाळे व एस. जी. शर्मा यांनी काम पाहिले.