जळगाव तालुक्यातील घटना, नशिराबाद पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव येथून गोंदियाकडे ट्रकमध्ये जाणारा सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा संशयास्पद रेशनचा तांदुळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे.
भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना धरणगावहून गोंदियाकडे ट्रकमध्ये रेशन मालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील यांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाजवळ ट्रक (एम.एच.१८ बी.झेड.१०३९) चा पाठलाग केल्यानंतर नशिराबादपासून काही अंतरावर ट्रक अडवला.चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीबाबत कुठलीही कागदपत्रे नसल्याने हा ट्रक नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आला. ही कारवाई मंगळवारी ३ रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली.
हा ट्रक निलेश वाणी रा. धरणगाव यांनी रेणुका माता ट्रेडिंग मार्केट यार्ड येथून येथील गोडाऊन मधून ५५० गोण्या तांदूळ घेऊन गोंदिया येथील जय बामलेश्वरी राईस सोर्टेक्स गोंदिया यांचेकडे नेला जात होता. चालक धनराज रामदास सोनवणे (वय ४३) व क्लिनर स्वप्नील संजू सोनवणे ( वय २०, दोन्ही रा. श्रीराम नगर, मुक्ताईनगर) यांच्यासह निलेश वाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलिस ठाण्यात ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात २९ टन वजनाचा व बाजारभावानुसार सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा तांदुळ असल्याचे स्पष्ट झाले. अन्न व पुरवठा अधिकार्यांकडून पंचनामा करण्यात आला. असून सायंकाळी पोहेकॉ सूरज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस अधिक्षक राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि राजेंद्र सांळुके हे करीत आहे.