चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याची कामगिरी
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, गोळीबार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींसह त्यांना शस्त्र पुरवठा करणाऱ्या अशा एकूण चार जणांना चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींकडून ३ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री रेल्वे स्थानक परिसरात गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली होती. या घटनेनंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सोमवारी, २२ डिसेंबर रोजी धुळे रोड परिसरात सापळा रचून दीपक सुभाष मरसाळे आणि अतुल गोकुळ कसबे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोठडीत असताना केलेल्या चौकशीत आरोपींनी हे कट्टे प्रथमेश लक्ष्मण भामरे आणि अमीर शेख शमशोद्दीन शेख यांच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही मंगळवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ताब्यात घेतले. संशयितांच्या घर झडतीमध्ये आणखी एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३ शस्त्रे आणि जिवंत राऊंड जप्त केले असून, सर्व आरोपींवर शस्त्र अधिनियमान्वये कडक कारवाई करण्यात येत आहे.









