वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील एका ७४ वर्षीय महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या शल्यचिकित्सा विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून तब्बल २० वर्षांपासून थॉयरॉईडच्या गाठीच्या त्रासापासून मुक्तता दिली आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले आहे.
धरणगाव तालुक्यातील फुलपाट येथील रहिवासी असलेल्या सुवर्णा अमरसिंग पाटील (वय ३४) यांची काही महिन्यांपूर्वी थॉयरॉईड झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शल्यचिकित्सा विभागात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुवर्णा यांची आई कमलाबाई यांनाही गेल्या २० वर्षांपासून थॉयरॉईड आजार होता. त्यामुळे त्याना अनेकवेळा जेवताना व अन्न गिळताना त्रास होत होता. मुलगी सुवर्णा यांचे उपचार चांगले झाले म्हणून त्यांच्या आई कमलबाई पाटील यांनीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली.
विभागात युनिट १ च्या प्रमुख डॉ. संगीता गावित यांनी विविध तपासण्या करून कमलबाई यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ८०० ग्रामचा थॉयरॉईडचा गोळा बाहेर काढण्यात आला. यामुळे कमलबाई यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शस्त्रक्रिया डॉ. संगीता गावित यांच्यासह सहायक प्रा. मिलिंद चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. सुनील गुट्टे यांनी केली. त्यांना बधिरीकरण शास्त्र विभागाचे सहा. प्रा. डॉ. अमित हिवरकर, डॉ. इकबाल नबी, डॉ. चेतन पाटील यांनी सहकार्य केले. शल्यचिकित्सा विभागप्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले. तसेच, रुग्णाला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. खाजगी दवाखान्यात पैसे भरपूर लागतील म्हणून शस्त्रक्रिया टाळत होती. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत व उत्तम शस्त्रक्रिया झाल्याने आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया कमलबाई पाटील यांनी दिली आहे.