पावसाळ्यात काळजी घेण्याचे अधिष्ठातांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाला यश आले आहे. यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
गफ्फार सत्तार तडवी (वय १७, रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर) हा मुलगा गावात परिवारासह राहतो. रविवारी दि. २३ जून रोजी मध्यरात्री मातीच्या घरात तो जमिनीवर झोपलेला असताना अचानक त्याला सापाने दंश केला. झोपेत त्याला कळले नाही. मात्र मध्यरात्री ३ वाजता त्याला उलट्या झाल्या. त्यानंतर त्याला दंश झाल्याचे कळले. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी सकाळी ७ वाजता दाखल केले. रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभागात युनिट प्रमुख सहयोगी प्रा. डॉ. पाराजी बाचेवार यांनी त्याला तपासून विविध रक्ततपासणी व एक्सरे काढून दाखल करण्यात आले.
तपासणीत, त्याला मज्जातंतूंवर आघात झाल्याचे (न्यूरोटॉक्झिक) दिसून आले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडचण होत होती. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वास मशिनवर (व्हेंटिलेटर) ४ दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर ऑक्सिजन देऊन त्याच्यावर उपचार करून सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. त्यानंतर शनिवारी तो मूळ स्थितीत येऊन बरा झाला. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून त्याला सुटी देण्यात आली.